मुंबई :भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ( Andheri byelection ) मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. अशातच या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( BJP murji patel ) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत त्यांचा २५ हजार मताधिक्याने विजय होईल, असा ठाम विश्वास भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला होता. परंतु ज्या परिस्थितीत मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे, ते पाहता आशिष शेलार पुरते तोंडघशी पडल्याचे चित्र दिसत आहे.
अर्ज मागे घेण्यास अनेक कारणे ?शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच होणारी अंधेरी पूर्व, विधानसभा ही निवडणूक अटीतटीची होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं नक्की कारण काय हे अजून गुलदस्त्यात असले तरीसुद्धा, जर भाजपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता मग इतका गाजावाजा करून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज का भरला गेला? त्याचबरोबर भाजपने पराभवाला घाबरून हा निर्णय घेतला का? मनसे प्रमुख, राज ठाकरे, यांनी उपुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावरून व राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी सांगितल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
अर्ज मागे घेण्यास शेलार यांचा विरोध ?मुरजी पटेल हे शेलार यांचे विश्वासू असून त्यांच्यामुळेच पटेल यांना उमेदवारी मिळाली. पण ते वादग्रस्त नेते असून स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याने फडवणीस हे सुद्धा उमेदवारी देण्यास अनुकूल नव्हते. मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यास प्रदेश सुकाणू समितीतील नेत्यांचे अनुकूल मत नसताना शेलार मात्र पटेल यांच्यासाठी आग्रही होते. तसेच पटेल यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार भाजपकडेही नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असूनही फडणवीस यांनी पटेल यांना उमेदवारी देण्याचे ठरविले. शेलार यांनी मात्र दहा-बारा दिवस आधीपासूनच मुरजी पटेल यांचे नाव जाहीर करून निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा केले होते. मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घ्यावा याला शेलार यांचा विरोध होता. शेलार यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका घेत पटेल यांचा अर्ज मागे घेण्यास विरोध केला. त्यानंतर फडवणीस यांनी आशिष शेलार, मुरजी पटेल, केंद्रीय सरचिटणीस व प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी चर्चा केली. मग केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी भेटल्यावर पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला.
राज पत्र, फडणवीसांची खेळी ?राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची मैत्रीपूर्ण संबंध पूर्वी पासून आहेत. त्यातच मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून आशिष शेलार विरोध करतील हे फडणवीस यांना चांगले ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी राज ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी उमेदवारी मागे घेण्याचे पत्र फडणवीस यांना लिहिले आणि शरद पवारांनाही असे आव्हान केल्यानंतर भाजपमधील चक्रे फिरली. वास्तविक या पूर्ण प्रकरणात एकीकडे राज ठाकरे यांना पत्र लिहिण्यास देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले असे म्हटले जात असताना, दुसरीकडे या निवडणुकीत मनसे ने पटेल यांना समर्थन देण्यासाठी आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले हे विशेष.या पूर्ण प्रकरणानंतर वरिष्ठांच्या खेळीमुळे आशिष शेलार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.