मुंबई -बीडीडी चाळीत सिलेंडर ब्लास्ट (BDD Chawl Cylinder Blast) झाला होता. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार (BJP Mla Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाची दखल राज्य महिला आयोगाने घेऊन तशी तक्रार त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. परंतु या संदर्भात बोलताना शेलार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कुठल्याही पद्धतीचे असं विधान केलं नाही, असे शेलार यांनी सांगितलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- चौकशी करा सत्य समोर येईल -
महापौरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व तशी तक्रार राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केल्याबद्दल प्रश्न आशिष शेलार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर बोलताना मी कुठलेही कधीही असे विधान केले नाही. कुठल्याही महिला किंवा महापौर यांच्याबद्दल मी असं बोललो नाही आहे. माझी पूर्ण पत्रकार परिषद पाहा मी असे विधान केलेले नाही. परंतु काही जणांना काही भेटले नाही म्हणून ते वातावरण निर्मिती करत आहेत, असे शेलार यांनी सांगितले आहे. सार्वजनिक आयुष्यात नितीमूल्य व नितीमर्यादा पाळणारा मी आहे. शिवसेनासारखा पाखंडी, अपप्रचार करणे अशी भाजपची भूमिका नाही. कुणी तक्रार केली असेल तर नक्की चौकशी करा सत्य समोर येईल. पण माझी विनंती आहे जे मी बोललोच नाही ते तुमच्या पक्षातील व तुम्हाला समर्थन आहे असे दाखवणारे सोशल मीडियावर तुमच्या नावाने लिहीत आहेत. त्यांच्यापासून तुमच्या बदनामीला वाचवले पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे सांगत महापौरांबद्दल भाजपला चिंता आहे, असा टोमणासुद्धा आशिष शेलार यांनी लगावला आहे.
बीडीडी चाळीत सिलेंडर ब्लास्ट झाला. त्यामध्ये नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळकं फिरवणारा आहे. नायर रुग्णालयात ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ या जखमींकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप शेलार यांनी केला होता. तर सिलिंडर स्फोटानंतर ७२ तासानंतर मुंबई महापौर पोहचतात, एवढे तास कुठे ... होतात? असे शेलार म्हटल्याचा उल्लेख राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. भायखळ्याचे गुंड सभागृहाबाहेर स्थायी समिती अध्यक्षांनी आणून ठेवले होते. यशवंत जाधव यांनी सभागृहात आमच्या नगरसेविकांना धमकी दिली. कोरोना काळात इतके गुंड सभागृहाबाहेर आणून गर्दी केली. यशवंत जाधव यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली होती.