मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेमध्ये व आज राज्यसभेमध्ये काँग्रेस सरकारचे वाभाडे काढले. करोना काळात महाराष्ट्र सरकारने श्रमिकांचे हाल केले असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर काँग्रेस व इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विशेष करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा करोना काळात श्रमिकांचे हाल कोणी केले? याबाबत रेल्वेची अधिकृत माहिती दिली आहे. या सर्वांचा समाचार भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतला असून, त्यांनी प्रत्येक गोष्टीला सडेतोड उत्तर दिले आहे.
माहिती देताना भाजप नेते आशिष शेलार हेही वाचा -Hindustani Bhau : वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला
तुमची चोरी पकडली आहे, त्याने तुम्ही हैरान झालात
"तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू" असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र द्रोही आहोत तर, तुम्ही चिनी हस्तगत आहात का? कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेची हैरानी बघून वास्तविक तुम्ही हैराण झाल्या पाहिजे होत्या. कोरोना काळात ६० हजार लोक मदतीसाठी अर्ज करतात, १२ बलुतेदारांना एक रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली नाही. सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात फक्त राजकारण आहे. महाराष्ट्राचे निर्दयी सरकार अर्ज फेटाळून देते, त्यातून हैरानी नाही दिसत तर काय दिसते? तुमची चोरी पकडली आहे. त्याने तुम्ही हैरान झाला आहात. परंतु, महाराष्ट्राच्या जनतेची हैरानी दूर करण्याचे काम भाजप करेल, असे आशिष शेलार म्हणाले.
लतादीदींचे स्मारक बांधण्यासाठी हात मागे घेतले आहेत का?
भारतरत्न स्वर्गीय लतादीदींचे स्मारक बांधण्यासाठी स्वतःच्या सरकारचे हात बांधले आहेत का? असा टोमणा आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. स्वतः बाबत निर्णय घेण्यास नेहमी पुढे असतात. फक्त एका व्यक्तीबद्दल स्मारक उभारण्यात सरकार पुढे, पण लतादीदींचे स्मारक बांधण्यासाठी हात मागे घेतले आहेत का? लता दीदींचे स्मारक बांधण्यासाठी सरकारची बोटचेपी भूमिका का? याचे उत्तर द्या, असेही शेलार म्हणाले. लतादीदी फक्त देशाच्या नाही तर, त्या महाराष्ट्राच्यासुद्धा अभिमानास्पद व्यक्ती होत्या व तुम्ही स्मारकासाठी केंद्रावर का बोट दाखवता? आम्हाला मैदानाची स्मशानभूमी बनवायची नाही आहे. स्थानिक लोकांची मते विचारात घेतली पाहिजे व नंतर स्मारक झाले पाहिजे. सर्व पक्षांनी लता दीदींना या वादात अडकवण्यापासून वाचवले पाहिजे. पण, स्मारक शिवाजी पार्क परिसरात झाला पाहिजे ही आमची मागणी आहे, असे शेलार म्हणाले.
संपूर्ण पाप महाविकास आघाडी सरकारचे !
कोरोना काळात श्रमिकांचे हाल झाले ते संपूर्ण पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे. मोदींनी राशन, आवश्यक पीपीई किट, ग्लब्ज, मास्क सर्वकाही गोष्टी दिल्या. परंतु, महाराष्ट्र सरकारने काय केले? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकार फक्त केंद्र सरकारवर खापर फोडत राहिले, असे शेलार म्हणाले. सुप्रियाताईं नौटंकी बंद करा, असे सांगत भाजप गावोगावी, गल्ली गल्ली मध्ये मदत करत होते. त्या दरम्यान तुम्ही कुठे होता? मुख्यमंत्री रिलीफफंडमधून 25 टक्के निधी सुद्धा खर्च केला गेला नाही. याला महाराष्ट्र द्रोह म्हणायचे का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.
जे सत्य आहे ते मोदींनी समोर आणले आहे
भारतरत्न लतादीदींच्या अंत्ययात्रेला बहिष्कार करण्याचे काम सुद्धा काँग्रेसने केले आहे. ते खरे राष्ट्रद्रोही आहेत. जे सत्य आहे ते मोदींनी समोर आणले आहे. या सगळ्या गोष्टी काँग्रेसला बोचणाऱ्या व शिवसेनेच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. सावरकर यांचा अपमान केला त्या काँग्रेस बरोबर शिवसेना सलगी करत आहे. खालच्या स्तरावर लैंगिक आरोप केले गेले त्यांना शिवसेनेने मांडीवर घेतले आहे. सावरकरांच्या गितांना चाली दिल्या म्हणून लता मंगेशकर कुटुंबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना कुरवाळत आहे. जनता हे सर्व बघत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय दुखवटा असताना मंत्री जयंत पाटील कार्यक्रम कसे घेतात? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -Antilia Explosive Case : एटीएस अहवालाच्या प्रती देण्याची अनिल देशमुख यांची आयोगाला विनंती