मुंबई -बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ( BMC Additional Commissioner ) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी हे ( Suresh Kakani Retired ) नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आशीष शर्मा यांची राज्य सरकाराने नियुक्ती केली आहे. शर्मा यांनी आज पदभार स्वीकारला. महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत यांनी शर्मा यांचे स्वागत केले.
या पदव्या घेतल्या -आशीष शर्मा हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आयआयटी दिल्लीमधून बीटेक पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस (पंजाब विद्यापीठ, चंदीगड) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तर प्रशासकीय सेवेत आल्यानंतर एम. एस्सी इन पब्लिक पॉलिसी ऍण्ड ऍडमिनिस्ट्रेशन ही पदव्युत्तर पदवी देखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (युनायटेड किंग्डम) मधून २००६-२००७ मध्ये संपादीत केली आहे.
या पदांचा अनुभव- शर्मा यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिमचे जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, केंद्रीय अपारंपरिक उर्जा मंत्र्यांचे खासगी सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर त्यांनी कामकाज केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य सचिव (वित्त), कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचे सहसचिव या पदांवर सेवा बजावली आहे. केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन महाराष्ट्र राज्य शासनाकडे शर्मा हे रुजू झाल्यानंतर प्रधान सचिव श्रेणीमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
हेही वाचा -Avinash Bhosale Arrested CBI : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक