मुंबई- सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानला जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे शिवसेनेत जाणे हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. तसाच हा धक्का अहिर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले सुनील शिंदे आणि आशिष चेंबूरकर यांच्यासाठी देखील आहे. कारण अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने वरळी मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल - आशिष चेंबूरकर अहिर यांच्या प्रवेशाबाबत चेंबूरकरांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचं स्वागत केलं आहे.अहिर यांच्या पक्ष प्रवेशासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य आहे. सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटली, म्हणून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असं आशिष चेंबूरकर म्हणाले. अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर की स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही असे अहिर म्हणाले. मात्र शिवसेनेचे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल, असे सांगितले आहे.
सचिन अहिर हे राष्ट्रवादीकडून वरळी विधानसभा निवडणूक लढवत होते. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आशिष चेंबूरकर यांना तिकीट देण्याची चर्चा होती. कारण 2009 च्या निवडणुकीत आशिष चेंबूरकर यांनी विधानसभा लढत सचिन अहिर यांना कडवी लढत दिली होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी पराभव केला. तेव्हापासून सचिन अहिर विरुद्ध आशिष चेंबूरकर असं चित्र वरळी परिसरात नेहमीच पाहायला मिळत आहे.