मुंबई - राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अडलेले घोडे आता पुन्हा एकदा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार पितृपक्षानंतर केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना स्नेहभोजनादरम्यान दिले होते. पितृपक्ष हा शुभकार्यासाठी योग्य काळ नसल्याचे मानले जाते. या कालावधीत अतृप्त आत्मे भटकत असल्याची अंधश्रद्धा ही पसरवली जात असते. त्यामुळे या कालावधीत कोणीही चांगले कार्य करण्याची जोखीम घेताना दिसत नाही. त्याला राजकारणीही अपवाद नाहीत. म्हणूनच आता पितृपक्ष रविवारी संपत असल्यामुळे सोमवारी घटस्थापना होणार आहे. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता -शिंदे आणि फडणवीस गटाच्या अनेक आमदारांना केल्या काही दिवसांपासून मंत्रिपदाची आस लागून राहिली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आमदार संजय शिरसाठ यांनी खाजगीत बोलताना ही माहिती दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही नाराज आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आमदार संजय शिरसाट यांचाही यात समावेश असण्याची शक्यता आहे.
कोणत्या आमदारांचा होऊ शकतो समावेश -शिंदे गटातील मुंबई आणि ठाणे या परिसरातील आमदारांचा अद्यापही मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सर्वाधिक ताकद देणाऱ्या आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असलेल्या या क्षेत्रातून आमदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच काही ज्येष्ठ आमदारांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, यांच्यासह अन्य काही आमदारांना सामावून घेतले जाऊ शकते. तर काही आमदारांना अन्य जबाबदारी देऊन शांत केले जाण्याची ही शक्यता आहे.
काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही -मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदातील मंत्र्यांनी आपला कारभार सुरू केला आहे. मात्र त्यांनीही अद्याप पूर्णतः कारभार करत निर्णय घेणे टाळले आहे. कारण अजूनही खाते बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यभार दिलेल्या काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. काही जणांचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्र्यांनीही काम करताना सावध पवित्रा घेतला आहे. तर शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. मंत्रालयातील दालन तयार होत असल्याच्या कारणास्तव अथवा अन्य काही कारणास्तव हा पदभार पूर्णतः स्वीकारण्यात आलेला नाही.