मुंबई -ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जमीन अर्जावर सुनावणी होणार असून आज आर्यन खानला दिलासा मिळतो का, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, आर्यन खानच्या वकिलांकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर साहिल याने लावलेल्या आरोपाशी शाहरुख खान तसेच त्याची मैनेजर पूजा ददलानी यांच्याशी काहीही संबंध नाही. किरण गोसामी आणि प्रभाकर साईल यांना आम्ही ओळखत नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. आर्यन खानच्यावतील वरिष्ठ वकिल मुकूल रोहतकी बाजू मांडणार आहेत.
आज होणार उच्च न्यायालयात सुनवाणी -
मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती यांनी 26 ऑक्टोंबर रोजी यापुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते. उच्च न्यायालयात आज या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद सुरू झाला आहे. त्यानंतर निकाल देण्यासाठी न्यायालय काही वेळ घेईल, अशी माहिती आहे. उच्च न्यायालय या महिन्याअखेरपर्यंतच नियमित कामकाजासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त न्यायालयाला दोन आठवड्यांची सुट्टी आहे.
2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यनला 'कॉर्डेलिया द इम्प्रेस' नावाच्या क्रूझवरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर 17 दिवस उलटून गेले, पण ड्रग्ज प्रकरणात आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. शाहरुखचे कुटुंबही तणावात आहे. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळालेले नाही, असा दावा आर्यनच्या वकिलांकडून केला जात आहे. पण एनसीबीने न्यायालयात दावा केला की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे.