मुंबई -आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका केल्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे. या आदेशाची प्रमाणित प्रत वेळेत तुरुंगात पोहचली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगामध्ये घालवावी लागणार आहे. उद्या सकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येणार आहे. तुरुंग अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा - आर्यन उद्या येणार तुरुंगाबाहेर -
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस न्यायालय सुटकेचे आदेश जारी करते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची आणि जमानतीची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात. या सर्व प्रक्रियेला आज उशीर झाला होता. त्यामुळेच आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावे लागणार आहे.
हेही वाचा -मुनमुन धमेचाची आज सायंकाळी सुटका होण्याचा वकिलांना आशा
आर्यन खानची उद्या सकाळी तुरुंगातून सुटका होणार आहे. तब्बल 27 दिवसांनी आर्यन आपल्या घरी जाणार आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने सर्वांना नियम समान असून, कुणासाठीही वेळेत बदल होणार नाही असे म्हटले आहे. सुटकेसाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेरील जामीन पेटीत रिलीझ ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष टाकावी लागते. यासाठी तुरुंग अधिकारी सायंकाळी 5.35 वाजेपर्यंत थांबतात, अशी माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली.
- जुही चावलाने केल्या जामीन पत्रावर सह्या -
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, जुही चावला आर्यनला लहानपणापासून ओळखते. त्यामुळे जामीनदार म्हणून जुही चावला आल्या आहेत. त्यांनी आर्यनच्या जामीन पत्रावर सह्यादेखील केल्या आहेत. तसेच १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिले. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता उद्या आर्यन खान तुरुंगाबाहेर येणार आहे. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत, त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये. तसेच आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा अटी उच्च न्यायालयाने लागू केल्या आहेत.
हेही वाचा -Aryan khan cruise case : आर्यन खानला एक लाख रुपयाच्या बाँडवर मिळाला जामीन