मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी न्यायालयाचे कामकाज थांबवले होते. त्यामुळे आर्यनच्या अर्जावर उद्या सकाळी 9.30 वाजता युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -Mumbai Cruise Drugs Case: यातील ९० टक्के प्रकरणे ही फेक सिद्ध होतील, मोदींनी याची माहिती घ्यावी- नवाब मलिक
- निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल -
विशेष न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारल्यानंतर आता या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे. विशेष न्यायालयाने फक्त ऑपरेटिव्ह ऑर्डर दिली असून त्यासंदर्भातले आदेश आल्यानंतर नेमके जामीन नाकारण्यासाठी काय कारण देण्यात आले हे समजू शकेल, असे देखील आर्यनच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.
- तिघांचा तुरुंगातील मुक्काम वाढला -
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
हेही वाचा -Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला
२ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. सुरुवातीला आर्यन सह दोघांना तर उर्वरित पाच आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. जामीन अर्जावर वादी - प्रति वाद्यांकडून जोरदार युक्तिवाद चालला. कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.