मुंबई -क्रूझ ड्रग प्रकरणात (Cruise Drug Case Update) जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी एनसीबी कार्यालयात (Aryan Khan attends NCB office) आज हजेरी लावली आहे.
- दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्यांना जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला मुंबईतील क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून जामीनावर सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे.