मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेण्यात आला आहे. यावर आपल्याला तपासातून काढण्यात आले नाही. प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा अशी याचिका मीच न्यायालयात दाखल केली होती, असा दावा केला. यावर आज सकाळी नवाब मलिकांनी आणखी एक टि्वट केले असून वानखेडेंना लक्ष्य केले आहे. समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली होती असा दावा केला आहे. आर्यन खानचे अपहरण केलं आणि खंडणी मागितली या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणतं ते पाहुयात असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मुंबई एनसीबीकडे असलेल्या सहा प्रकरणाचा तपास एनसीबीचे एसआयटी पथक करणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांकडून हे एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच तपास करण्यात येत असलेल्या या प्रकरणांच्या तपासातून कोणत्याही अधिकाऱ्याला काढण्यात आलेले नाही, आधीचे सर्व अधिकारी तपासात असतील, असे स्पष्टीकरण एनसीबी दिल्लीकडून देण्यात आले आहे.