मुंबई - मुंबई गोरेगाव येथील 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापेमारी केली होती. सकाळी सात वाजल्यापासून ईडी संजय राऊतांची चौकशी करत होती. त्यानंतर आता ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले ( ED Detained Sanjay Raut ) आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे, अशा शब्दांत सावंतांनी संताप व्यक्त केला ( Arvind Sawant Criticized Modi Government ) आहे.
'मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी...' -शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक देत कारवाईला सुरुवात केली. तब्बल नऊ तास राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी केली. चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा ठपका ठेवत ईडीने संजय राऊत यांना दुपारी चार वाजता ताब्यात घेतले. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ईडीवर जोरदार टीका केली. 'भाजपचे मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. देशात लोकशाही टिकवायचे असेल तर चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी ही या विरोधात भूमिका घेणे अपेक्षित असल्याचे,' अरविंद सावंत म्हणाले.