मुंबई - मुंबईच्या सायन येथील शिव किल्ल्यापासून काही अंतरावर ऐतिहासिक तोफ खाना आहे. या तोफ खान्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची गरज आहे. सायन किल्ल्यापासून ( Sion fort ) जवळच सायन तलाव आहे. या तलावावर त्याकाळी घोडे पाणी पियायला येत असत. या तलावापासून काही अंतरावरच एक तोफखाना ( Artillery ) आहे. तोफा बाहेर काढण्यासाठी जागा, तोफ खाण्यात जाण्यासाठी जागा, बाजूने व वरून दगडी तटबंदी अशी याची रचना आहे. माहीमच्या खाडीमधून आक्रमण झाल्यास या तोफखान्यामधून सायन किल्ल्याची सुरक्षा करता यावी, अशी याची रचना करण्यात आली आहे. हा तोफखाना आता अनधिकृत बांधकामामुळे ( Unauthorized construction ) लुप्त होत आहे.
तोफखान्यावर झोपड्या :मुंबई महापालिकेच्या सायन उदनचन केंद्राच्या बाजूलाच असलेल्या या तोफ खान्यावर गेल्या काही दशकात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पाणी पुरवठा करणारी एक मोठी पाण्याची टाकीही यावर उभारण्यात आली आहे. तोफखान्याच्या बाजूलाच झोपड्या उभ्या राहिल्याने हा तोफखाना जतन करण्यापासून वंचित राहिलेला आहे. तोफखान्यात जाणारा रस्ता लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.