मुंबई - शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून पालिकेने विभागवार कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. यापैकी भांडूप येथे उभारण्यात आलेला कृत्रिम तलाव काल शुक्रवारी कोसळला. हीच घटना विसर्जनावेळी झाली असती तर मोठ्या प्रमाणात गणेश भाविक जखमी झाले असते. याची गंभीर दखल पालिकेने घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकार आणि महापालिकेने केले आहे. मुंबईत गणेश मूर्त्यांचे विसर्जन मोठ्या प्रमाणात नैसर्गिक विसर्जन स्थळ असलेल्या चौपाट्यांवर किंवा तलावात केले जाते. मुंबईत अशी 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळी लाखो भाविक दरवर्षी जमा होतात. यावर्षी ही गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 167 कृत्रिम तलाव बनवले आहेत. त्यात विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
भांडूप येथे विसर्जनासाठी 13 कृत्रिम तलाव बनवले जात आहे. सेंटर पॉईंट येथे लालशेठ कंपाउंड येथे असाच एक तलाव उभारण्यात आला. स्थानिक आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते या तलावाचे भूमिपूजन करण्यात आले. गुरुवारी 20 ऑगस्टला त्याचे काम पूर्ण झाले. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी हा तलाव कोसळला. यामुळे विभागाला तलावाचे रूप आले. अनेक दुकानांमध्ये पाणी जाऊन दुकानातील वस्तूंचे नुकसान झाले. हाच प्रकार विसर्जनाच्या दिवशी झाला असता तर अनेक भाविक जखमी झाले असते. याची गंभीर दखल पालिकेने घेतली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
का कोसळला तलाव -
कृत्रिम तलाव बांधताना खोल खड्डा खोदला जातो. मात्र, भांडूप येथे डांबरी रस्त्यावर कृत्रिम तलाव उभारण्यात येत होता. लाकडी सामानाचा वापर करून तलाव उभारताना त्याला बाजूला आधार देण्यात आला नव्हता. यामुळे पाणी भरताच हा तलाव कोसळला. विशेष म्हणजे 4 लाख रुपये खर्च करून हा तलाव उभारण्याचे काम शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला देण्यात आले होते.
हेही वाचा -सुखकर्ता.. दु:खहर्ता... मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील आरती