मुंबई - आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, भाजपाशी युती केल्यास शिवसेनेला ते परवडणार नाही. तसेच शिवसेनेचे खच्चीकरण आणि राजकीय दृष्ट्या कमकुवत केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला आव्हान देऊ नये, अशी भाजपाची तजवीज यामागे असल्याचेही प्रधान यावेळी म्हणाले.'आघाडीतील नेत्यांना त्रास'भाजपा देशात २०१४ पासून सत्तेत आहे. राज्यात फडणवीस सरकारने शिवसेनेच्या सोबतीने मागील पाच वर्ष सत्तेचा गाडा हाकला. मोदी- शहांच्या भाजपाने याकाळात शिवसेनेचे खच्चीकरण करून हा पक्ष कसा संपेल, यासाठी प्रयत्न केले होते. कधी राष्ट्रवादीची भीती घातली तर कधी दुय्यम स्थानाची वागणूक दिली. युती काळात शिवसेनेचा छळ करण्यात आला. सन २०१९ मध्येही लोकसभा - राज्यसभा निवडणूक युतीत लढले. सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेला बाहेर ठेवण्याचे प्रयत्न झाले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीतील नेत्यांना त्रास देण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भाजपाने सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, किरीट सोमैया, नारायण राणे, आशिष शेलार, राणे पुत्रांकडून विविध आरोप केले जात आहेत. याच्या जखमा शिवसैनिकांच्या मनात आजही घर करून आहेत. त्यामुळे भाजपशी युती करूच नये, अशी शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रीय राजकारणराष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने भाजपाचा प्रमुख विरोधीपक्ष म्हणून जागा निर्माण केली आहे. ज्याप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी, त्याचप्रमाणे शिवसेना लढत असून भाजपाला तोडीस तोड उत्तर देत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खडसावताना, शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी आणि जाणव्याचे नसून देशाचे आणि वेदांचे हिंदुत्व असल्याचे ठणकावले आहे. कॉंग्रेस सोडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न झाल्यास शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास शिवसेना भाजपाला डोईजड होईल आणि त्यांची कोंडी होईल. त्यामुळे शिवसेना - भाजप युतीचे प्रस्ताव लोकांसमोर मांडून सरकार डळमळीत झाल्याचे चित्र रंगवले जात आहे. मात्र, भाजपाच्या या प्रयत्नांना यश येईल, असे वाटत नाही असेही यावेळी संदीप प्रधान यांनी म्हटले आहे.
राजकीय विश्लेषक संदीप प्रधान.. युती सरकारच्या काळात भाजपा- शिवसेना सबंधांमध्ये तणावटॉप सिक्युरिटीच्या प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीचा सामना करत आहेत. यामागे भाजपाचा दबाव, या चौकशीचा ससेमिरा थांबावा आपली सुटका व्हावी, या हेतूने आमदार सरनाईक यांनी शिवसेना नेतृत्वाला भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दरम्यान, ठाकरे यांनी मोदी आमचे शत्रू नाहीत, त्यांच्यापासून आम्ही राजकीय फारकत घेतली असली तरी आमचे संबंध चांगले आहेत, असे सूचक वक्तव्य केले होते. ही वेळ साधून सरनाईक यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचा हेतू चौकशी थांबावी, असा असून यामागे भाजपाचे दबावाचे राजकारण आहे. कारण राष्ट्रवादीने अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला, तर पुढील अडीच वर्ष मुख्यमंत्री पद राखण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, युती सरकार काळात शिवसेना - भाजपा संबंधांमध्ये ज्याप्रकारणे तणाव निर्माण झाला आहे. दोन्हीकडील नेत्यांनी एकमेकांवर टीकेची तोफ डागली आहे. ते शिवसेना- भाजपाचे मनोमीलन झाले, तरी त्यांच्यामधील कटुता कमी होणार नाही. उलट सत्तेमुळे ती अधिक वाढू शकते.'शिवसेनेपुढील धोका'बिहारमध्ये नितीश कुमार यांना मोदींना पर्याय म्हणून पाहिलं जात होते. मोदींसोबत त्यांनी युती केल्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांची अवस्था आज बिकट आहे. त्यांचे संख्याबळही घटले असून, तेथे भाजपाची ताकद वाढली आहे. तसेच ज्यांनी स्वतःच्या ताकदीवर सत्ता स्थापन केली, त्याच नितीश कुमारांना भाजपाने सत्तेवर बसले आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपासोबत युती केल्यास भाजपा शिवसेनेचे खच्चीकरण आणि राजकीय दृष्ट्या कमकुवत केल्याशिवाय राहणार नाही.
राजकीय विश्लेषक विजय घोरपडे.. भविष्यातही हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर असलेला हा पक्ष आपल्याला डोळे वटारून दाखवणार नाही, आव्हान देणार नाही, याची तजवीज भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील नेते करतील, हा धोका मात्र निश्चितच शिवसेनेपुढे आहे, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले आहे.'जखमा इतक्या लवकर भरणार नाहीत'प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, आणि तो घेतल्यानंतर खऱ्याअर्थाने हा विषय चर्चेचा बनू शकतो. तसेच एका पत्रामुळे सरकार पडले असे आपणाला म्हणता येईल. मात्र, आज तशी परिस्थिती नाही. मुळात भाजपासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातील की नाही, ही खरी शंका आहे. युतीच्या काळातील घाव, जखमा अजूनही भळभळत आहेत. त्या इतक्या लवकर मिटणार नाहीत. कारण युवती सरकारच्या काळात शिवसेनेचा जो काही अपमान, छळ झाला आहे, तो ते इतक्या लवकर विसरतील असे मुळीच नाही. असं मत राजकीय विश्लेषक विजय घोरपडे यांनी म्हटले आहे.