मुंबई - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह्य, असभ्य आणि बदनामीकारक लेखन केल्याचा आरोप होत आहे. भालचंद्र नेमाडे यांची हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांच्या याच पुस्तकात हिंदू समाजातील बंजारा, धनगर, लमाण, वडार अशा अनेक समुहातील महिलां संदर्भात आक्षेपार्ह्य लेखन केल्याचा आरोप होत आहे. या कांदबरीवर बंदी घालण्यात यावी तसेच लेखक आणि प्रकाशकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.
हिंदू महिलांवर आक्षेपार्ह्य लेखन करणाऱ्या भालचंद्र नेमाडेंना अटक करा - हरिभाऊ राठोड - Bhalchandra nemade
ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकातील लेखन हिंदू महिलांची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा आरोप होत आहे. नेमाडे यांची कादंबरीवर बंदी आणावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
लेखक-प्रकाशकावर गुन्हा दाखल करावा
माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत लेखक भालचंद्र नेमाडे यांचा धिक्कार करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंदू कादंबरीचे लेखक नेमाडे आणि प्रकाशक पॉप्यूलर प्रकाशन यांच्यावर अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी माजी आमदार राठोड यांनी केली आहे. नेमाडे यांच्या कादंबरीत आक्षेपार्ह्य लेखन असतानाही त्यांना ज्ञानपीठ हा साहित्यातील महत्त्वाचा पुरस्कार कसा काय मिळू शकतो, असा सवाल राठोड यांनी उपस्थित कला. नेमाडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. लेखक आणि प्रकाशकांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी माजी आमदार राठोड हे २० फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.