मुंबई - विविध राज्यांमधील परप्रांतिय मजुरांना आपल्या गावी पाठविण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी योग्य आहे. आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. पण कोरोनाच्या या संकटांत जो महाराष्ट्रांतर्गत भूमिपूत्र जिल्हा-जिल्ह्यामध्ये अडकला आहे. जे कोणी स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण, वैद्यकीय कारणांसाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसेची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.
महाराष्ट्रात अडकलेल्यांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करा, प्रवीण दरेकर यांची मागणी - प्रविण दरेकर यांची मागणी
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांच्या घरी येण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करा अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे आपला स्थानिक भूमिपूत्र जिल्ह्यामध्ये अडकला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हांतर्गत बंदी असल्यामुळे त्या भूमिपुत्रांना आपापल्या जिल्ह्यात जाता येत नाही, त्यामुळे आज त्या भूमिपूत्रांचे कुटुंबीय चिंतेत आहे. मग या स्थानिक भूमिपुत्रांचा वाली कोण आहे, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी तत्काळ व प्राधान्याने विशेष बस व्यवस्था करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र बांधव व भगिंनींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाता यावे यासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवर बसेसची व्यवस्था करून एक विशेष अभियान राबवावे, असेही दरेकर यांनी नमूद केले आहे.