मुंबई -भारतात कोरोनाचे 30 रुग्ण आढळल्याने देशभरातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेता पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. सद्या परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.
मुंबईत येणाऱ्या जहाजांची पडताळणी करताना कोरोनाचा एक संशयित आढळून आला होता. मात्र, तपासणीअंती त्याच्या रिपोर्ट निगेटीव्ह आल्या आहेत. मुंबईत दररोज सुमारे 18 हजार प्रवासी बाहेरून येतात. त्यांची तपासणी करण्यासाठी जवळपास 100 डॉक्टरांची गरज आहे. पालिकेने या ठिकाणी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांव्यतिरिक्त स्वत: चे 50 डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.