मुंबई -राजा ढाले यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी देखील राजा ढाले यांच्या जाण्याने चळवळीचा राजा हरपला, अशी प्रतिक्रिया व्यक्ती केली.
ढालेंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचा 'राजा' हरपला - अर्जुन डांगळे
राजा ढाले यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे, असे मत अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले.
आंबेडकरी चळवळीतील नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले, ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत दादर येथे उद्या अंत्यसंस्कार केला जाणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ आणि मित्र म्हणून आमचे मोठे नुकसान झाले आहे. असे डांगळे यांनी सांगितले.
ढाले यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. चळवळीत ढाले यांचे योगदान फार मोठे होते. साहित्याच्या क्षेत्रातील, सामाजिक आणि धम्मातील राजा ढाले यांच्यामुळे दलित पँथर उभारणीला एक नवचैतन्य मिळाले होते. यामुळे एक नवीन पिढी तयार झाली होती. या पिढीचे नेतृत्व राजा ढाले यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने चळवळीची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. त्यांच्याकडे इतर गोष्टी पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता ते एक अत्यंत चिंतनशील आणि तत्त्वज्ञानी, व्यासंगी व्यक्तिमत्व होते. स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना भरपूर विरोध पत्करावा लागला. मात्र, ते घाबरले नाही त्या विरोधाला सामोरेही गेले. ते कोणाचीही भीडभाड ठेवत नव्हते, जे पटत नाही त्याला ते उघड विरोध करत होते. ढाले आणि आमच्या मित्र मंडळीसह माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी एक जवळचा मित्र गमावला याचे मोठे दुःख मला झालेले आहे, असे डांगळे म्हणाले.