मुंबई - हायपरलूप मुंबई-पुणे या प्रकल्पाला पायभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई, हायपरलूप टेक्नोलॉजी, आयएसी यांच्या भागीदारी समुहाला मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
'मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प' मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी राबवला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती 496 किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई मधील प्रवासाचा कालावधी फक्त 23 मिनिटांचा होणार आहे.