मुंबई -गेली ३६ वर्षे एसटीचे स्टेअरिंग हाती पकडत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा वसा यशस्वीपणे सांभाळणारे इस्लामपूर आगाराचे चालक माणिक यादव हे सोमवारी एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी माणिकराव यादव यांना फोन करत त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच कौतुकाची थाप देत पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. परिवहन मंत्र्यांच्या शुभेच्छांमुळे यादव अक्षरश: भारावून गेले होते.
'तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे एसटीची वाटचाल यशस्वीपणे सुरू'
एसटीचे चालक ही आपली नोकरी न समजता समाजाचे व्रत मानून माणिक यादव यांनी ३६ वर्षे प्रवाशांची अविरत सेवा केली. या प्रदीर्घ सेवेनंतर माणिक यादव हे सोमवारी सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवेतील शेवटच्या दिवशी निरोप घेताना त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला घट्ट मिठी मारली, तसेच एसटीतील गणपतीबाप्पाच्या प्रतिमेसमोर हात जोडून नतमस्तक झाले आणि यादव हे गहिवरून आले. यादव यांच्या एसटीवरील प्रेमाची व निष्ठेची दखल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी घेतली. त्यांनी यादव यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. आपली एसटीशी नाळ घट्टपणे जोडली गेली असल्याने आपण गेली अनेक वर्षे मनापासून जी सेवा केलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करतो. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष व निष्ठावान कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे एसटीची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे, असे कौतुगोद्गार काढत मंत्री, ॲड. परब यांनी माणिक यादव यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.