अँटिलिया कार स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेक गाड्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत पाच गाड्या एनआयएनं ताब्यात घेतल्या आहेत. यानंतर आज वोल्वो ही सहावी गाडी ठाणे येथून एनआयएने ताब्यात घेतली आहे. या गाडीला आगोदर एटीएसने ताब्यात घेतलं होतं. मात्र तपास एनआयएकडे आल्याने ठाण्यावरुन ही गाडी एनआयएने ताब्यात घेतली. आता या गाडीचा संपूर्ण गाडीची फॉरेन्सिककडून तपासणी केली जाईल. कारण आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक गाडीचा तपास फॉरेन्सिककडून केला गेलाय. जेणेकरुन तपासात महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी...
LIVE Updates : अँटिलिया, मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणाचे ताजे अपडेट्स.. - Sachin Waze matter update
19:09 March 30
या प्रकरणातील सहावी 'व्हॉल्वो' कार एनआयए कार्यालयात दाखल..
19:06 March 30
एनआयएने एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पाठवले समन्स..
एनआयएने गुन्हे शाखेत अधिकारी राहिलेल्या एका सीनिअर इन्स्पेक्टरला समन्स पाठवले आहे. काही दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. वाजे प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली होती. 4 मार्च रोजी हे अधिकारी सीआययू कार्यालयात होते. त्यानंतर वाजे ठाण्याकडे रवाना झाले त्यावेळी वाजेंनी स्वतःचा फोन कार्यालयात ठेवला होता.
16:38 March 30
किशोर ठक्करच्या नातेवाईकालाही घेतले ताब्यात..
महाराष्ट्र एटीएसने किशोर ठक्कर याच्या एका नातेवाईकाला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. किशोरला आज सकाळी अटक करुन एनआयएच्या ताब्यात देण्यात आले होते.
15:32 March 30
विनायक शिंदे आणि नरेश गौर यांना सात एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी..
विनायक शिंदे आणि नरेश गौर यांना सात एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने याबाबत आज निर्णय दिला. या दोघांवरही यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
15:17 March 30
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओहोळ चालवत होते ही गाडी..
एनआयएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई मधून एक गाडी हस्तगत करण्यात आली आहे. ही गाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओहळ चालवत होते. एनआयएने ओहोळ यांची यापूर्वीही चौकशी केली असून, आता ते खरेच ही गाडी चालवत होते का? कोणाच्या सांगण्यावरुन त्यांनी ही गाडी मुंबईमध्ये पार्क केली, आणि या गाडीचा गुन्ह्यात काय वापर करण्यात आला या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
15:07 March 30
सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त
सचिन वाझे यांच्या नावावर असलेली आणखी एक गाडी नवी मुंबईतील कामोठे परिसरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने जप्त केली आहे. एका सोसायटीच्या समोरील रस्त्यावर ही गाडी बेवारसरित्या पडून असल्याचे समोर आले होते. मात्र, याबद्दल स्थानिकांनी कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा क्रमांक आहे MH01 AX 2627 असा असून हिंदुस्थान मोटर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे मॉडेल असलेल्या या गाडीचा चेसीस नंबर MA701CW5WBD001995 असा आहे. ही गाडी 23 जून 2011 रोजी सचिन वाझें याच्या नावावर रजिस्टर करण्यात आली होती.
15:05 March 30
विनायक शिंदे आणि नरेश गौर यांना घेऊन एनआयए पथक विशेष न्यायालयाकडे रवाना..
आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना घेऊन एनआयए पथक एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे निघाले आहे. पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे आणि एनआयएचे वकील विशाल गौतम हे दोघेही सोबत आहेत.
14:04 March 30
एनआयएचे डीआयजी विधी कुमार एनआयए कार्यालयात दाखल..
एनआयएचे डीआयजी विधी कुमार एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती ते घेणार आहेत.
13:15 March 30
आरोपी किशोर ठक्कर एनआयएच्या ताब्यात..
सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवणारा आरोपी किशोर ठक्कर याला एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे त्याची एटीएसमार्फत चौकशी सुरू होती. याआधी देखील एटीएसने गुजरात मधून सिमकार्ड पुरवणाऱ्या नरेश गौर याला अटक केली होती. सध्या नरेश गौर हा देखील एनआयएच्या ताब्यात आहे. किशोर ठक्कर याच्याकडून पोलिसांना 15 सिम कार्ड मिळाले आहेत. सिमकार्ड विकण्यासोबतच तो एक बुकी असल्याचेही समोर आले आहे.
12:47 March 30
स्वतःचे बनवले होते सर्च इंजिन आणि मेसेजिंग अॅप
दरम्यान, सचिन वाझे हा तांत्रिकदृष्ट्या पारंगत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सचिन वाझेने पोलीस खात्यात येण्यापूर्वी स्वतःचे एक मेसेजिंग ॲप बनवले होते. त्याने स्वतःच्या नावाचे सर्च इंजिनही त्याने बनवून घेतल्याचे समोर आले आहे. सचिन वाझेने बनवलेले 'direct baat' हे मेसेजिंग अॅप तो स्वतः वापरत होता. या मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून तो कुठल्या-कुठल्या व्यक्तींच्या संपर्कात होता याचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहे. दरम्यान सचिन वाझेचे मेसेजिंग अॅप हे गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे.
12:41 March 30
सचिन वाझेंवर पुन्हा जे.जे. रुग्णालयात उपचार..
सध्या एनआयएकडून सचिन वाझेंची चौकशी सुरू आहे. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू आहेत.
12:30 March 30
मिठी नदीतून सापडलेला प्रिंटर विनायक शिंदेचा; तर डीवीआर सचिन वाझेच्या सोसायटी मधला..
मिठी नदीतून सापडलेला प्रिंटर विनायक शिंदेचा तर डीवीआर सचिन वाझेंच्या सोसायटी मधला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांना जे धमकीचे पत्र देण्यात आलं होतं ते त्याच प्रिंटरमधून टाईप केलं गेलं होतं. या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
12:18 March 30
हिरेन हत्याकांडातील आणखी एक आरोपी समोर..
मुंबई : अँटिलियाबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड या दोन्ही प्रकरणांचा तपास आता एनआयए करत आहे. हिरेन हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला एनआयएच्या ताब्यात देण्यासाठी एटीएसचे पथक ठाण्याहून मुंबईला रवाना झाले आहे.
या व्यक्तीचं नाव ठक्कर असून, वाझेला बनावट सिमकार्ड पुरवण्यासाठी त्याने मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून ठक्कर हा एटीएसच्या ताब्यात होता.