अनंतनाग ( जम्मू आणि काश्मीर ) : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम भागात अमरनाथ गुहेजवळ मंगळवारी दुपारी ढगफुटीमुळे अचानक पूर ( flash floods near Amarnath cave ) आला. पहलगाम भागातील अमरनाथ गुहेजवळ दुपारी ३ च्या सुमारास ढग फुटले, परिणामी पूर आला. यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सध्या अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसानंतर अमरनाथ गुहेजवळ अचानक ढग फुटले. मात्र, SDRF आणि सुरक्षा दलाच्या पथकांनी यात्रेकरूंना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. एसडीआरएफ आणि सुरक्षा दलाच्या पथकांनी या परिसरातून सुमारे ४ हजार यात्रेकरूंना सुरक्षित बाहेर काढल्याचे सांगण्यात आले.
अमरनाथ यात्रा पुढे ढकलली: अधिका-यांनी मंगळवारी सांगितले की, पंचतर्णी आणि गुफा दरम्यानची अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पवित्र गुहा मंदिराच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर आज दुपारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जवळच्या नाल्यातील पाण्याची पातळी वाढली, असे ते म्हणाले. यात्रेकरूंना पंचतर्णी छावणीत परत नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. हवामान सुधारल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरी दुर्घटना : विशेष म्हणजे, अमरनाथच्या पवित्र गुहेजवळील पहिल्या ढगफुटीत 16 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि 65 हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर याच वर्षातली ही दुसरी घटना आहे.
हेही वाचा :Video : अमरनाथच्या ढगफुटीनंतरचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ.. पहा ढगफुटीनंतरची भीषण परिस्थिती