मुंबई - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान आहे. ते कार्य पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी मी वर्षानुवर्षे झटलो. आताच्या सरकारने देखील या मागणीला जोर लावावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज (शनिवार) जन्मशताब्दी. या निमित्ताने चेंबूरच्या सुमन नगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास भेट देवून पुतळ्यास पुष्पवृष्टी करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे.. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया हेही वाचा -मोहम्मद रफी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, रामदास आठवले यांची मागणी
मुख्यमंत्री असताना मी स्वतःहून लक्ष घालून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावी, यासाठी केंद्रापर्यंत पत्रव्यवहार केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. मुंबई पूर्व उपनगर चेंबूर सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळत स्वयंसेवकांनी स्मारक परिसरात सॅनिटायजर सहीत अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
यावेळी सॅनिटायझिंग करूनच स्मारक परिसरात प्रवेश दिला जात होता. दरम्यान, काही संघटनांनी स्मारक परिसरात अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहीजे अशी घोषणा करत निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे अशिष शेलार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, रिपाइंचे अविनाश महातेकर आदी मान्यवारांनी लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास भेट देवून अभिवादन केले.