मुंबई - मुंबईतील आरे कॉलनी येथील अठरा हजार जनावरे पाण्यावाचून तडफडत असल्याची माहिती समोर आली ( Animals Deprived Water ) आहे. या कॉलनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन न दिल्याने पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती गोठा मालक चंद्रकुमार सिंग यांनी दिली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथे आरे दूध कॉलनी सुमारे १९३९ मध्ये स्थापन करण्यात आली. यावेळी मुंबई वासियांची दुधाची गरज भागवण्यासाठी आरे दूध कॉलनी वसवण्यात आली. या कॉलनीत सुमारे 30 मोठ्या युनिटच्या माध्यमातून अनेक गोठे तयार करण्यात आले. या गोठ्यामध्ये आज मिळून सुमारे अठरा हजार जनावरे आहेत. यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश अधिक आहे.
सुमारे ५०० गोठा मालकांच्या माध्यमातून येथे गोठे चालवले जातात. पाणी पुरवठा करण्यासाठी दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. मात्र, या कंत्राटदाराने आपल्या कामगारांना गेल्या काही महिन्यांचे वेतन दिले नाही. राज्य सरकारकडूनच वेतन आले नसल्याने कामगारांना वेतन दिले गेले नसल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी आज ( सोमवार ) सकाळपासून अचानक संप पुकारून काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे येथील अठरा हजार जनावरे पाण्याविना तडफडत असल्याचे सिंग यांनी यांनी म्हटलं आहे.
दुग्धविकास आयुक्तांनी दखल घ्यावी -यासंदर्भात राज्याच्या दुग्धविकास आयुक्तांनी योग्य दखल घेऊन कारवाई करावी आणि पाण्यापासून वंचित असलेल्या जनावरांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
हेही वाचा -Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्लांकडून राऊत, खडसेंचा 127 वेळा फोन टॅप?