मुंबई :मुंबईतून मराठी माणूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्यामुळे बाहेर फेकला गेला असं सातत्याने आरोप बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब ( Shiv Sena leader Anil Parab ) यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर देताना, शिंदेंना मराठी माणसाबाबत आता साक्षात्कार झाला आहे, असा खोचक टोला अनिल परब यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
मिंदे नव्हे तर बाळासाहेबांचे खंदे : बंडखोरी करत राज्यात सत्तांतर केल्याने शिवसेना आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. नुकताच मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेल्याचे सांगत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच आम्ही मिंदे नव्हे तर बाळासाहेबांचे खंदे असल्याचे म्हटले. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
इलेक्शनला सामोरे जावे असा इशारा : एकनाथ शिंदे यांना मराठी माणसाबाबत आता मुख्यमंत्री झाल्यानंतर साक्षात्कार झाला आहे. यापूर्वी कुठे होते असा सवाल परब यांनी उपस्थित केला. खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जातोय यावर देखील परब यांनी भाष्य केले. खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचे अधिकार ना निवडणूक आयोग, ना भाजपला ठरवायचा आहेत. न्यायालय यावर निर्णय देणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा तळागाळातील शिवसैनिकांना एकही ओरखडा बसलेला नाही. शिवसेनेच्या गटनेत्यांच्या मेळाव्यात खरी शिवसेना काय आणि कोणती हे गर्दीतून दिसून आले, असे परब म्हणाले. मात्र ते खंदे आहेत की मिंदे आहेत, हे लोकांनी ठरवायचे आहे. त्यामुळे आम्ही आव्हान करतोय, राजीनामा देऊन त्यांनी इलेक्शनला सामोरे जावे असा इशारा परब यांनी दिला.
न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भूमिका स्पष्ट करेल :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेने शिवतीर्थावरील मेळाव्याला परवानगी देण्यास कायदा व सुव्यवस्थेचा कारण पुढे करत नकार दिला. शिवसेनेने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यावर सुधारित याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. अर्जदार कोण आहेत, कोण नाही हे उद्या कोर्टासमोर स्पष्ट होईल. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कला न्यायालय परवानगी देईल, असा विश्वास असल्याचे परब यांनी सांगितले. मात्र, भाजपकडून शिंदे गटाला परवानगी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. परब यांनी यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. युक्तिवाद भाजप समोर नाहीतर कोर्टासमोर होणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच 1966 पासून कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आलेला नाही. त्यामुळे सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असे परब यांनी सांगितले. न्यायालयाने परवानगी न दिल्यास शिवसेनेची भूमिका काय यावर कायद्याचा निकाल काय लागतो हे तपासून बघू त्यानंतर शिवसेना आपला निर्णय घ्यायला मोकळी असल्याचे परब यांनी म्हटले. मनसेचेही परब यांनी चांगलीच धुलाई केली. मनसे केवळ इशारा देता येतो, पुढे काहीच करत नाही, असा टोला लगावला.