धुळे- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अनिल गोटे आणि राज ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात असून, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता वाढली आहे.
तयारी विधानसभेची; अनिल गोटे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट - राज ठाकरे
राजकीय पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात प्रचार केला होता. भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी वेळोवेळी आपल्या प्रचारातून टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विविध ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात कृष्णकुंज येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे देखील कृष्णकुंजवर पोहोचले. यावेळी अनिल गोटे आणि राज ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.