मुंबई : गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला गेले असून ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची शक्यता असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. अनिल देशमुख यांनी दिल्लीत काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप लावले. या आरोपांच्या चौकशीसाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश सीबीआयला दिले. त्यानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्याविरोधात तसेच सीबीआय चौकशीविरोधात दाद मागू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सीबीआयचे पथक मुंबईत येणार
अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मंगळवारी मुंबईत येणार आहे. परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यास अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितल्याचा पत्राद्वारे लावला होता. या आरोपांची चौकशी आता सीबीआयकडून केली जाणार आहे. या चौकशीचा प्राथमिक अहवाल येत्या पंधरा दिवसात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करावा लागणार असल्याने ही चौकशी लवकरात लवकर करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत येणार आहे. सीबीआयच्या टीमकडून अनिल देशमुख यांची देखील चौकशी केली जाणार आहे.
परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणी 15 दिवसांत प्राथमिक तपासणी पूर्ण करून कारवाईसंदर्भात निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी दाखल तिन्ही याचिका कोर्टाने निकाली काढल्या आहेत. हे एक अभूतपूर्व आणि विलक्षण प्रकरण असून याच्या स्वतंत्र चौकशीची गरज असल्याचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णींच्या खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने 15 दिवसांत प्राथमिक तपास पूर्ण करून कारवाईचा निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे. परमबीर सिंग, जयश्री पाटील आणि मोहन भिडे या तिघांनी दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहे. या तिघांच्याही याचिका कोर्टाने निकाली काढल्या आहेत. 25 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावत त्यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते.
गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंगांचे आरोप
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना बार आणि रेस्टॉरंट्समधून दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. यानंतर राज्यासह देशात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.