मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख राज्य सरकारकडून स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कुटूंबही आहे. या आयोगासमोर काल परमबीर सिंग यांची चौकशी झाली. आतापर्यंत माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे, देशमुखांचे यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांची पण चौकशी झालेली आहे.
असे आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. विशेष न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांची 13 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणात ईडीने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाची कोठडी देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.