महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Resignation LIVE : अनिल देशमुख यांचा राजीनामा, दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

anil deshmukh resignation
anil deshmukh resignation

By

Published : Apr 5, 2021, 3:00 PM IST

Updated : Apr 5, 2021, 8:41 PM IST

20:40 April 05

सीबीआयची टीम उद्या मुंबईत होणार दाखल

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम उद्या (मंगळवार) मुंबईत दाखल होत आहे. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर प्रतिमहिना १०० कोटी रुपये वसुलीचा आदेश दिल्याचा आरोप लावला आहे.  

20:30 April 05

..तर या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील - पंकजा मुंडे

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंकजा मुंडे यावर ट्विट करत ' देर आये पर दुरुस्त नहीं आये', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल, असा टोला लगावला आहे.

19:47 April 05

आता मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, आठवलेंची मागणी

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला, मात्र फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

19:14 April 05

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेलाकामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याचेही या पत्रात नमूद आहे.

18:57 April 05

गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री ठरवतील - जयंत पाटील

गृहमंत्री पदासाठीच्या संभाव्य व्यक्तीबद्दल भाष्य करू नये, गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री ठरवतील. तसेच सीबीआयने चौकशी केल्यावर सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. कोरोनामुळे विधानसभा अध्यक्ष पद भरले नाही, लवकरच ते भरले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

18:57 April 05

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर नाही - जयंत पाटील

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर नाही. अनिल देशमुख यांनी स्वतः हा शरद पवार यांच्याकडे जाऊन चौकशी होणार असेल तर मी राजीनामा देतो असे म्हणून राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच चौकशी होणार असेल तर स्वत हून त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

17:54 April 05

राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला रवाना

मुंबई -राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते प्रफुल पटेल यांची भेट घेणार आहेत.  

17:30 April 05

नवा वसुली मंत्री कोण? गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची टीका

चित्रा वाघ यांनी केलेले ट्विट

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. 

17:00 April 05

देशमुखांच्या सीबीआय चौकशीतून जे बाहेर येईल, त्याने सर्वसामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल - चंद्रकांत पाटील

सीबीआयचे अधिकारी जेव्हा अनिल देशमुख यांची चौकशी करतील तेव्हा त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर पडतील. तेव्हा महाराष्ट्रातल्या  सर्वसामान्य माणसांचा राजकारणावरील विश्वास उडेल, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर समाधान व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सीबीआयच्या 15 दिवसांच्या प्राथमिक चौकशीतून अनिल देशमुखांनी सचिन वाझेना खरेच 100 कोटी गोळा करून देण्यास सांगितले होते का? हे पैसे कसे गोळा करायचे याचा हिशोब सांगितला होता की नाही ? हे सगळं चौकशीतून बाहेर पडेल. सीबीआय त्यांच्या स्टाईलने हे सगळे बाहेर काढेल आणि ते जेव्हा महाराष्ट्राच्या जनते समोर जाईल तेव्हा त्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल.

15:59 April 05

महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता

ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे सोपवला आहे. ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्र्यांची अतिरिक्त जबाबदारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्रीपदासाठी सर्वात पुढे दिलीप वळसे पाटील यांचं नाव असून दुसऱ्या क्रमांकावर ती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती मानले जातात. अशा कठीण परिस्थितीत सर्वात विश्वासू व्यक्तीकडे हे पद असण्याची गरज असल्याने दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाला प्रथम पसंती शरद पवारांकडून दिली गेली असल्याची माहिती समोर येतेय.
 

15:49 April 05

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का ? - रविशंकर प्रसाद

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत. त्यांच्या मौनामुळे अनेक सवाल निर्माण होत आहेत. असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. 

15:46 April 05

मुख्यमंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे - देवेंद्र फडणवीस

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात त्यामुळे मुख्यमंत्री यांनी लोकांना आश्वासित करण्याची गरज आहे. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का, असं विचारण्याची गरज आली आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा अपेक्षितच होता. यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता - फडणवीस

या सरकारचे तीनही चाक वेगवेगळ्या दिशेत फिरत आहेत आणि आत्ता जनतेला सुद्धा लक्षात आले आहे. जनता यात भरडत आहे. संजय राऊत यांची परिस्थिती सहनही होत नाही आणि बोलू ही शकत नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात बोलतात त्यांना त्याच काही कळत नाही -फडणवीस

15:43 April 05

परमबीर सिंग याचिकेत उच्च न्यायालयाचा बॅलन्स निकाल- अ‌ॅड स्वप्ना कोदे

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले आहे. मात्र सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर यासंदर्भात सीबीआयकडून तपास केला जात असताना कुठल्याही व्यक्तीची चौकशी केली जाऊ शकते, असं ज्येष्ठ वकील अॅड स्वप्ना कोदे यांनी म्हटले आहे.

15:08 April 05

हसन मुश्रीफ कोल्हापूरहून मुंबईला रवाना

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राजीनामा पत्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर हसन मुश्रीफ कोल्हापूरहून मुंबईला रवाना

15:06 April 05

परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांमुळे राजीनामा - नवाब मलिक

नवाब मलिक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांमुळे राजीनामा उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिक यांनी दिली आहे. 

15:06 April 05

मुंबई हायकोर्टाचा जर काही निर्णय आला असेल तर त्या निर्णयाचा अभ्यास करायला हवा - संजय राऊत

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी 15 दिवसात सीबीआयने पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मुंबई हायकोर्टाचा जर काही निर्णय आला असेल तर त्या निर्णयाचा अभ्यास करायला हवा. मला कोर्टाच्या निर्णयाबाबत पूर्ण माहिती नाही. अशा वेळी राज्याच्या गृहमंत्र्यांबाबत काही बोलणं योग्य नाही असे संजय राऊत म्हणाले.

14:50 April 05

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा

मुंबई -राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाची राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. 

परमबीर सिंग यांच्या आरोपांचा सीबीआय तपास -


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणी 15 दिवसांत प्राथमिक तपासणी पूर्ण करून कारवाईसंदर्भात निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी दाखल तिन्ही याचिका कोर्टाने निकाली काढल्या आहेत.

अभूतपूर्व आणि विलक्षण प्रकरण -


हायकोर्टहे एक अभूतपूर्व आणि विलक्षण प्रकरण असून याच्या स्वतंत्र चौकशीची गरज असल्याचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णींच्या खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने 15 दिवसांत प्राथमिक तपास पूर्ण करून कारवाईचा निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे. परमबीर सिंग, जयश्री पाटील आणि मोहन भिडे या तिघांनी दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहे. या तिघांच्याही याचिका कोर्टाने निकाली काढल्या आहेत. 25 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावत त्यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते.

सुनावणीत न्यायालयाचे सिंगांना खडे बोल -


मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी 31 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परमबीर सिंग यांना तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडला असे खडे बोल सुनावले होते. मुंबई पोलीस आयुक्त या नात्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल करणं ही तुमचीच जबाबदारी होती. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले होते. वरिष्ठ जरी कायदा मोडत असतील तरी, त्याची तक्रार देऊन गुन्हा दाखल करणं ही तुमचीच जबाबदारी आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावर ताशेरे ओढले होते. या सुनावणीत अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य शासनाची बाजू मांडली तर परमबीरसिंग यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विक्रम ननकणी यांनी युक्तीवाद केला. एएसजी अनिल सिंह यांनी सीबीआयच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट केली होती.

परमबीर सिंग यांचे आरोप -
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप लावला. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. मात्र, पक्षाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यांचा राजीनामा घेतला नाही.
 

Last Updated : Apr 5, 2021, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details