मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीच्या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विशेष कोर्टाने EDची कोठडी नाकारल्यानंतर अनिल देशमुख यांना अर्थरा रोड जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्याविराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनवाई करत न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
शनिवारी विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती -
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना 14 दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली होती.