मुंबई -महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर त्यांना आता आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली.
देशमुखांची कोरोना चाचणी
अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी तसेच इतर वैद्यकीय चाचणी करण्यात येतील. अहवाल आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार आहे. मात्र, त्यांना कुठल्या तुरुंगात पाठवण्यात येणार आहे, याबाबत अद्याप सांगण्यात आले नाही. जामिनासाठी अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात येईल. या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तथापि, जामीन मिळेपर्यत देशमुख यांना आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात येणार आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी अनिल देशमुखला अटक केली होती. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्याकडून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती.