मुंबई -शंभर कोटी भ्रष्टाचार प्रकरणी मागील दोन महिन्यापासून गायब असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज (सोमवारी) शेवटी मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख यांच्या हजेरी बाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे सांगितले आहे.
'ईडी कार्यालयात हजर होणं शेवटचा पर्याय होता'
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता आणि हे प्रकरण इतक्या टोकाला गेले की आरोप लावणारे परमवीर सिंह आणि ज्यांच्यावर आरोप लावले गेले ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख दोघेही मागील दोन महिन्यापासून गायब होते. परमवीर सिंग यांच्याबाबत अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नसला तरी अनिल देशमुख शेवटी ईडी कार्यालयात दाखल झाले. यापूर्वी अनिल देशमुख यांना ईडीतर्फे चौकशीला हजर राहण्यासाठी पाचवेळा समन्स पाठवण्यात आले होते. तरीसुद्धा अनिल देशमुख कार्यालयात हजर झाले नव्हते. परंतु पाणी डोक्यावरून जाते की काय या परिस्थितीत असताना, आता शेवटी अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाले आहेत. अनिल देशमुख यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु दोन्ही ठिकाणी त्यांना दिलासा भेटला नसल्याकारणाने अखेर त्यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणून त्यांना ईडी अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागले आहे. अन्यथा उच्च व सर्वोच्च न्यायालय दोन्हीकडून त्यांना दिलासा न भेटल्याने त्यांना फरार घोषित करावे अशी मागणी किरीट सोमैया यांनी सुद्धा केली होती.