मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर 4 मार्चला पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली होती, या बैठकीत कोरोना काळामध्ये बारवर जे निर्बंध घातले आहेत, याबाबत चर्चा करण्यात आली होती. ही माहिती अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनी ईडीला दिली आहे, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
वकील जगतापांनी फेटाळला दावा-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी ईडीचा हा दावा फेटाळून लावला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्री कार्यालयातून होत असतात असे वकील शेखर जगताप यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे.
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याद्वारे देशमुखांवर प्रत्येक महिन्याला शंभर करोड रुपये वसुली टारगेट दिले होते, असा आरोप एका पत्राद्वारे करण्यात आला आहे. याच प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या प्रकरणी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना २५ जूनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायलायाने त्यांना एक जुलैपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर या दोघांना पुन्हा १ जुलै रोजी न्यायालयाने ५ जुलै पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.