सांगली -महिन्याला शंभर कोटी रुपये वसुलीच्या आरोपात एक नंबरचा आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख नसून तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष असल्याचा सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. यामुळे अनिल देशमुख यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा याची दखल घेतील, अशी अपेक्षाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. जयंत पाटील सांगलीच्या केरेवाडीमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नाहक बदनामीचा प्रयत्न -
100 कोटी वसुली आणि खंडणी प्रकरणी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी दरम्यानचा अहवाल माध्यमांसमोर आला आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि ईडीकडून सुरू असलेली कारवाईवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसला नाहक बदनामी करण्याची ही कारवाई असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
100 कोटी खंडणी प्रकरणात आता अनिल देशमुखांना दोषी धरणे योग्य नाही - जयंत पाटील - माजी गृहमंत्री अनिल देशमुख
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली होती. आता सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आल्यासंदर्भात एक अहवाल सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. तसेच यासंदर्भात काही वृत्तपत्रात बातम्याही छापून आल्या आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असे सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप याबाबत सीबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया किंवा खुलासा आलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची याबाबत सीबीआयने खुलासा करण्याची मागणी केली आहे.