मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांंची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) भ्रष्टाचार प्रकरणात झाडाझडती केली जात आहे. मात्र, चौकशीचे समन्स बजावूनही देशमुख त्याला प्रतिसाद देत नसल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. अटक होईल यामुळे चौकशीला देशमुख बगल देत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड
ईडीने आज देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, संबंधित गुन्ह्यांची माहिती मिळावी, असे पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिले आहे. अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईसीआयआरची कॉपी देण्यात यावी, जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे ईडीला अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे, अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे.
५ वेळा समन्स, संपत्ती जप्त
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. अनिल देशमुख यांना आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावण्यात आले. तरीही देशमुख चौकशीला जाण्याचे टाळत आहेत. देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
काय आरोप आहे देशमुखांवर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच, अनिल देशमुखांवर ते अनेक अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप करण्यात आला आहे.