मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडीसमोर हजर झाले आहेत. सोमवारी सकाळी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले. देशमुख यांच्या वकिलांनी याची माहिती दिली. पाच तासांपासून त्यांची ईडीकडून देशमुख यांचा जबाब नोंदविला जात आहे. दरम्यान, यावेळी देशमुख यांनी एक व्हिडिओ जारी करून पुन्हा एकदा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर; दिले हे स्पष्टीकरण मी ईडी, सीबीआयला सहकार्य केले
मला ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चूकीच्या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या गेल्या. जेव्हा जेव्हा ईडीने मला समन्स बजावले तेव्हा मी त्यांना कळविले की माझी कोर्टात केस सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात येईल असे मी त्यांना कळविले. जेव्हा ईडीने आमच्या घरी धाड टाकली. तेव्हा आम्ही सर्वांनी आम्ही त्याला सहकार्य केले. सीबीआयच्या समन्सलाही मी स्वतः हजर होऊन उत्तर दिले. अजूनही माझ्या केसवर सुनावणी सुरू आहे असे देशमुख म्हणाले.
आरोप करून सिंग स्वतःच गायब
परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आणि ते स्वतःच गायब आहेत असेही देशमुख यांनी म्हटले आहे. ते कुठेतरी परदेशात असल्याची आता माहिती येत आहे असे म्हणत सिंग यांच्यावरही देशमुख यांनी निशाणा साधला.
अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर; दिले हे स्पष्टीकरण म्हणून देशमुख हजर
१०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपांवरून ईडीने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, ते ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं खेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्स यूनिट हेड होते. तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंना बोलवून घेत दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे आरोप सिंग यांनी यातून केले होते. या आरोपांनुसार, देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे असे आरोप सिंग यांनी केले होते.