मुंबई- माजी गृहमंत्री आणि माजी पोलीस आयुक्त कुठे हनिमुनला चालले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगाविला आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बेपत्ता असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यावरून अमृता फडणवीस यांनी ही टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की सर्वांचे हिंदुत्व सारखेच असते. परंतु त्याला विविध रंग देण्याचे काम हे राजकारणी करत असतात. त्यामुळे अशा राजकारण्यांपासून सावध राहायला हवे, असेही त्यांनी सांगितले आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोनाला प्रतिबंध करणारी जगातील सर्वात मोठी मोहीम हाती घेण्याचा निश्चय २०२० साली केला. २०२१ साली त्याची पूर्तता होत आहे. म्हणूनच भारतातील १०० कोटी जनतेला लस देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन व आभार प्रकट करण्यासाठी मुंबईतील माधवबाग येथे १०० दीप प्रज्वलित करण्यात आले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
हेही वाचा-दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !
काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार-
शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून वारंवार मोदी सरकार व भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाल्या, की सामनाकडे फक्त तेच काम आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार आहे. लुटारुंवर टीका करणे सामनाला शक्य नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हेच त्यांचे एकमेव काम असल्याचे सांगत अमृता फडणीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.