मुंबई - जुहू परिसरातील जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम (JVPD) ही उच्चभ्रू वस्ती मानली जाते. या परिसरात अनेक फिल्मी कलाकारांचे बंगले आहेत. जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, अनिल कपूर, अजय देवगण ई. बॉलिवूड स्टार्स या परिसरात वस्तीला आहेत. त्याचबरोबर मिलेनियम सुपरस्टार अमिताभ बच्चन सुद्धा याच परिसरात राहतो. आधी प्रतीक्षा बंगल्यात राहणारे बच्चन कुटुंबीय गेल्या दशकापासून जवळच्याच जलसा या बंगल्यात राहतात. कोरोना फैलावण्याआधी दर रविवारी याच बंगल्यासमोर रविवारी चाहत्यांची गर्दी उसळत असे कारण अमिताभ बंगल्याच्या गच्चीत येऊन त्यांना अभिवादन करीत असे. खरंतर या प्रकारामुळे दर रविवारी संध्याकाळी त्या परिसरात प्रचंड ट्राफिक जॅम होत असे. आता कोरोना महामारीमुळे जमावबंदी असल्याकारणाने असे काही घडताना दिसत नाही.
अमिताभ बच्चनने हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली आणि आजही तो ‘ईन-डिमांड’ कलाकार आहे. त्याने जुहू परिसरात बरेच बंगले खरेदी केले आहेत आणि असे म्हटले जाते की त्या परिसरातील कोणताही बांगला विकायचा असेल तर पहिल्यांदा अमिताभला कळविले जाते. पुढे असेही कानावर पडते की त्याच्या जलसाच्या आजूबाजूला त्याचे अर्धा डझन बंगले आहेत. बच्चन कुटुंबीय जलसामध्ये शिफ्ट झाल्यावर अमिताभच्या मातोश्री तेजी बच्चन यांनी प्रतीक्षामध्येच राहणे पसंत केले होते. आता असे कळतंय की अमिताभ बच्चनने आपल्या बंगल्यांपैकी काहींचे तळमजले भाड्यावर दिलेले आहेत. त्याने आणि अभिषेकने जलसा जवळीलच अम्मू आणि वत्स बंगल्यांचे काही भाग स्टेट बँकेला भाडेतत्वावर दिलेत. अर्थातच त्यांना रग्गड भाडे मिळणार असून ही जागा १५ वर्षांच्या लीजवर दिली गेली आहे. याआधी येथे सिटी बँक होती जिने २०१७ मध्ये लीज रिन्यू केली नाही.