मुंबई - भाजप व शिवसेनेच्या महायुतीचे घोंगडे अजूनही भिजत असून, आता पितृ पक्षानंतर युतीच्या अधिकृत घोषणेला मुहूर्त मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या (दि.26सप्टेंबर)ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुंबई दौरा होणार होता. यावेळी युतीमधील अंतिम जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याने सेनेला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
शिवसेना आता बॅकफूटवर आली असून, भाजपच्या मर्जीनुसार हे जागावाटप होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युती होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चिले जात आहे.
हेही वाचा दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना युती होण्यासंदर्भात विचारल्यावर,त्यांनी युती होणार असल्याचे जुजबी उत्तर दिल्याने या शंकेला बळ मिळाले आहे. त्यातच अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याने शिवसेनेला आता वाट पाहण्या व्यतिरिक्त पर्याय नसल्याचे चित्र आहे.