मुंबई - कोरोनामुळे मुंबईकरांना निर्बंधांबरोबरच प्रवास करतानाही हाल सोसावे लागत आहे. दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, दुसरी लाट ओसरत असून, नागरिकांकडून लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. असे असतानाही अद्याप बंदी हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यात येणार आहे. याबाबत मुंबईकरांना काय वाटतं याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट...
आता तरी लोकल रेल्वे प्रवासाला परवानगी द्या; चाकरमान्यांची मागणी - मुंबई लोकल
दुसरी लाट ओसरत असून, नागरिकांकडून लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. असे असतानाही अद्याप बंदी हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यात येणार आहे. याबाबत मुंबईकरांना काय वाटतं याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट...
गेलं दीड वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरीय लोकल रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोना संकटामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे किमान लसीकरण पूर्ण झाले तरी प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. विरोधी पक्षाने देखील हा विषय पकडून ठेवला नाही. आज याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा देखील होणार आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे.
बेस्ट बसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नागरिकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतं. यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आता तरी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी विनोद मोहिते यांनी केली आहे. ठाण्याच्या पुढून कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या लोकांना लोकलवरच अवलंबून राहावे लागते आणि जर बस किंवा एसटीचा वापर करायला गेल्यास दोन ते तीन तास जायला लागतात. त्यामुळे एरवी लोकलने 20 ते 25 रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी नागरिकांना 200 ते 250 रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय कोरोनामुळे पगारही पूर्ण मिळत नाही आहे. त्यामुळे बसने जाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजणे शक्य नसल्याचे काशीनाथ भिसे यांनी सांगितले. ट्रेन बंद असल्याने खूप त्रास होत आहे. यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. सामान घेण्यासाठी खासगी वाहनाना जावे लागते. यामुळे खूप त्रास होतो. जेवढ्या सामानात नफा होतो तेवढा खर्च तर प्रवासात जातो, असे मोबाईल मॅकेनिक मनोज बुटीया यांनी सांगितले.