मुंबई - मुंबई महापालिकेत सफाई कामगार काम करतात. हे सफाई कामगार अनुसूचित जातीमधील आहेत. त्यांच्या निवृत्ती आणि मृत्युनंतर गेल्या तीन ते चार वर्षात थकबाकी देण्यात आलेली नाही. अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांना सरकारी लाभापासून वंचित ठेवले जात आहे. हे अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी एक षड्यंत्र असल्याने पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेने दिला आहे.
सफाई कामगार अधिकारांपासून वंचित :जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. कोरोना काळातही सफाई कामगारांनी चांगले का केले. त्यांना कोरोना योध्याचा दर्जा देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली. सफाई कामगार महापालिकेची ३० ते ३५ वर्षे सेवा केल्यावर निवृत्त होतात. सफाई काम हे घाणीचे असल्याने अनेकांचा आजाराने निवृत्ती आधीच मृत्यू होतो. अशा सुमारे १० हजार सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेकडून गेल्या २ ते ३ वर्षात निवृत्ती वेतन, पेन्शन व त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेली नाही. या सफाईचे कामगारांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महापालिकेकडून केले जात असल्याची माहिती सफाई कामगार विकास संघाचे अध्यक्ष सुनील चौहान यांनी दिली.
'अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करू':सफाई कामगारांना गेल्या दोन ते तीन वर्षात निवृत्ती वेतन, पेन्शन व त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेली नाही. यासाठी पालिकेकडे आरटीआय टाकला असता पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील सफाई विभागात १२६ क्लार्क तर ८० हेडक्लार्कची भरती करण्यात आली नसल्याचे समोर आले. या कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून पालिका आयुक्त, सहा आयुक्त प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र या भरतीकडे पालिका आयुक्त आणि अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी लाभापासून वंचित ठेवले जात आहे. यासाठी पुढील १५ दिवसात पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पात्र देणार आहोत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा चौहान यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.