महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील तिन्ही गायी लम्पीमुक्त, गायींचे मुंबईत शंभर टक्के लसीकरण - तीन गायींना लम्पीची लागण

लम्पी विषाणुचा शिरकाव मुंबईत झाला आहे. तीन गायींना लम्पीची लागण झाली होती. मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे मुंबईतील तिन्ही गायी लम्पीमुक्त झाल्या आहेत.

मुंबईतील तिन्ही गायी लम्पी मुक्त
मुंबईतील तिन्ही गायी लम्पी मुक्त

By

Published : Sep 24, 2022, 7:16 PM IST

मुंबई -मुंबईमधील आतापर्यंत ३२२६ पैकी ३२०६ गायींचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. लम्पी चर्मरोग हा केवळ गायींना होत असून आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने माणसाला रोग होण्याची भीती नसल्याचे पेठे यांनी सांगितले. लम्पी विषाणुचा शिरकाव मुंबईत झाला आहे. तीन गायींना लम्पीची लागण झाली होती. मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे तिन्ही गायी लम्पी मुक्त झाल्या आहेत.

लक्षणे आढळल्यास संपर्क साधा -लम्पी विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेली टीम बनवली आहे. या टीमद्वारे महापालिका क्षेत्रातील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय जनावरे व २४,३८८ म्हैसवर्गीय जनावरे असून, प्राधान्याने ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याशी ०२२-२५५६-३२८४, ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे.


पालिकेची लम्पीसाठी नियमावली -गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात; त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास बंदी असणार आहे. गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेऊ नये. गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराई करिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

ABOUT THE AUTHOR

...view details