मुंबई - नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायरबरोबरच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे’ निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. तसेच ‘ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टँकरला वळवू नयेत’, अशा सूचनाही दिल्या.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, ऑक्सिजन उपलब्धतेसाठी अश्वीन मुदगल, ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी दीपेंद्र कुशवाह आणि रेमडेसिवीर उपलब्धतेसाठी विजय वाघमारे उपस्थित होते.
'रुग्णांना ऑक्सिजन द्या'
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्या. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करावे, असे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. तसेच रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जातोय का, तो वाया जावू नये, यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे, याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाही ना, तो वाया जात नाही ना याची पाहणी करावी, अशा सूचना कुंटे यांनी दिल्या आहेत.