मुंबई -शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रांगणात वाढत आहेत. सकाळी जमावबंदी, रात्री नाइट कर्फ्यु तर शुक्रवार ते सोमवार विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यादरम्यान दारूच्या दुकानांवर गर्दी होऊन कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी नोंदणी केल्यावर दारू विक्रीचे लायसन्स असलेल्या दुकानदारांनी दारू घरपोच तसेच पार्सल द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काढले आहेत.
दारू घरपोच -
मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार दोन महिन्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. जमावबंदी, नाईट कर्फ्यु तसेच विकेंड लॉकडाऊन लागू आहे. यादरम्यान वाइन शॉप उघडल्यावर तेथे प्रचंड मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र मुंबईतील अनेक भागात पाहावयास मिळाले होते. त्यामुळे पोलिसांनी ही वाइन शॉप्स बंद केली होती. आता पुन्हा ही दुकाने उघडली जाणार आहे. या दुकानांवर दारू विक्री केली जाणार नाही. मात्र, ऑर्डर देऊन पार्सल किंवा घरपोच दारू मिळणार आहे. ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे, अशा लोकांना सकाळी 7 ते रात्री 8 दारू घरपोच मिळणार आहे. मद्य घरी पोहोचवणाऱ्या व्यक्तींने वैयक्तिक स्वच्छता आणि कोविडसंबंधीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. तर बारमधूनही मद्य घरपोच मिळणार आहे.
काय म्हटले आहे परिपत्रकात?
1) जो अनुज्ञप्तीधारक भारतीय बनावटीचे विदेशी मद्य - स्पिरिटस, बीअर, सौम्य मद्य, वाइन या मद्य प्रकाराची विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करतो, केवळ त्या मद्य प्रकाराची विक्री करेल; फक्त परवानाधारकाने संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदविली तरच, परवानाधारकास अशा मद्याचे वितरण अनुज्ञेय मद्याचे परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल.