मुंबई -नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो. सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेल्या दिल्या आहेत.
हेही वाचा-रात्री 11 आधी पार्टी आटोपण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन; हॉटेल्सना 'ही' सूट
दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरू करुया-
उपमुख्यमंत्री अजित पवार नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, मावळत्या 2020 वर्षाने आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धुत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करुया. कोरोनापासून स्व:तचे, कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरू करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
येणारे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारे, राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.