मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा आहे. पवार साहेब ७९ व्या वर्षातून ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. त्या सगळ्या प्रसंगाना कसे धीराने तोंड द्यायचे? हे त्यांनी दाखवून दिले आहे.
'शरद पवार सगळ्या प्रसंगाना धीराने तोंड देतात'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस कृषी कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त अजित पवार यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना त्यांच्या राजकीय आणि कौटुंबीक आठवणी जाग्या केल्या.
राजकीय जीवनात काम करताना त्यांनी अनेक माणसे जोडली. वयाच्या ३८ व्या वर्षात त्यांना पुलोद सरकारचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यावेळेस देश पातळीवरचे ज्योती बसू, शेख अबद्दुला, प्रकाश सिंग बादल यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. शरद पवार यशवंतराव चव्हाणांच्या हाताखाली तयार झालेले नेतृत्व असल्याने त्यांनी सर्वांना आपलेसे केले.
राजकीय जीवनात नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या संस्था त्यांनी जागतीक पातळीवर पोहोचवण्याचे काम केले. क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्राला मदत करण्याचे काम त्यांनी केले. कोणत्याही संकटावर मात करू समाजासाठी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या.