मुंबई - केवळ जरंडेश्वर कारखाना नाही तर, राज्यात जवळपास 60 ते 70 कारखाने चालवायला दिले आहेत. हे कारखाने नेमके कोणीकोणी घेतले? तसेच किती किमतीमध्ये कारखाने विकत घेतले? यासंदर्भात उद्या(22 ऑक्टोबर) आपण पत्रकार परिषद घेणार असून, कारखान्याबाबतचे कागदपत्र पत्रकार परिषदेतून समोर आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.
माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार - केवळ पवार कुटुंबियांवर आरोप केले जातात -
केवळ जरंडेश्वर कारखानाबाबत बोलले जाते. मात्र, राज्यामध्ये जवळपास 60 ते 70 साखर कारखाने चालवायला दिले असून, काही कारखाने अवघ्या अडीच ते तीन कोटीमध्ये चालवायला दिले असल्याचेही यावेळी अजित पवारांनी सांगितले. तसेच कारखाने विकत घेणारे शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि विकासक आहेत. त्या कोणाबद्दल बोलले जात नाही. केवळ आपल्या कुटुंबावर आरोप केले जातात. छगन भुजबळ यांची देखील अशाच प्रकारे बदनामी करण्यात आली होती, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -'जरंडेश्वर'बद्दल शरद पवार गप्प का?; किरीट सोमैयांचा सवाल
भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी काल (20 ऑक्टोबर) ईडी कार्यालयात जाऊन जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात कागदपत्रे आणि काही पुरावे अधिकाऱ्यांना दिले. तसेच जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या बहिणींच्या मालकीचा असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केला.
- आपण कोणतीही बेईमानी केलेली नाही -
आपल्याला उभा महाराष्ट्र ओळखतो. आपण कधीही बेईमानी केलेली नाही. आजही राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला दिले आहेत. काही लोक आपल्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करत आहेत. 1990 सालापासून आपण राजकीय जीवनात सक्रिय असून, उभा महाराष्ट्र आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. आपण कधी खोटं बोलत नाही. कधी बेईमानी करत नाही. पवार कुटुंबियांच्या रक्तात बेईमानी नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
- कोणी चूक केली असेल तर पुढे येईल-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता नांदेडच्या एका मंत्र्यावर तपास यंत्रणेचा ससेमिरा सुरू होईल असे वक्तव्य केले होते. मात्र, ज्याने चूक केली असेल तर समोर येईल. आरोप करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. आरोपांबाबत तपास यंत्रणा चौकशी करून सत्य पुढे आणतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर दिली आहे.
हेही वाचा -अजित पवार यांचा जरंडेश्वर कारखान्यावर बेनामी पद्धतीने कब्जा; किरीट सोमैया यांची ईडीकडे तक्रार