मुंबई- महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक आहे. असे म्हणत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्क्याने, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण हे ५८ हजार मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे, नागपूर आणि औरंगाबादेत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी-
पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड विजयी झाले आहेत. तर, औरंगाबाद मतदार संघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सर्वात आश्चर्यकारक निकाल हा नागपूर मतदारसंघाचा लागला आहे. नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या ५८ वर्षापासून नागपुरात भाजपाचीच सत्ता होती. तब्बल ५८ वर्षांनी भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडली आहे. भाजपाने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात त्यांचा पराभव होणे, हा सर्वात मोठा धक्का आहे.
हेही वाचा -५८ वर्षांनी भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार : नागपुरात काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारींचा दमदार विजय