मुंबई - सोशल मीडियावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध असल्याची पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून ही पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र आज विधानसभेत राजकीय नेत्यांवर खोट्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या पोस्टविरोधात निषेध व्यक्त केला.
'वैयक्तिक टीका नको'
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या खोट्या पोस्टचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यामुळे पटोले यांचे आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता ज्याने ही खोटी पोस्ट तयार केली असून यासंबंधी पोलिसांकडून तक्रार दाखल केली जात नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, नेत्यांवर अशाप्रकारे वैयक्तिक किंवा राजकीय खोट्या पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाना पटोले यांनी घेतली फडणवीसांची बाजू
महाराष्ट्राच्या संस्कृतीत विरोधीपक्ष नेते असो किंवा कोणीही नेता असो, मात्र त्यांच्यावर अशी वैयक्तिक टीका किंवा त्यांची बदनामी करता येणार नाही. म्हणूनच देवेंद्र फडणीस यांची अशी बदनामी होऊ नये, यासाठी हा मुद्दा मी समोर आणत त्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी सदनासमोर केली असल्याचे स्पष्टीकरण दिले.